औरंगाबाद : शेतीच्या वादातून दोन गटात राडा, मारहाणीत महिलेचा गर्भपात
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत एका महिलेला जबरी मारहाण झाली असून या दुर्दैवी घटनेत तिचा गर्भपात झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद शहरातील जटवाड्यात शुक्रवारी (दि.30) सकाळी ही घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर अचानक या घटनेचे रुपांतर तुफान हाणामारीत झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेशी संबंधित असणाऱ्या काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेत नेमक्या किती लोकांना दुखापत झाली हे समजू शकले नाही. पण एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला आहे. मारहाणीबाबत मेडिकल अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. मेडिकल अहवाल प्राप्त होताच अनेक गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दौलताबाद पोलीस तपास करत आहेत.