वाळू लिलावावरुन साताऱ्यात दोन गटात राडा ! तलवार-रॉडने हाणामारी, 2 जणांचा जागीच मृत्यू, जिल्ह्यात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –   सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नरवणे येथे आज (बुधवार) दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर केलेल्या सशस्त्र हल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही गटांनी तलवारी आणि लाठ्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केला. चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडीबा जाधव असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील नरवणे येथे आज सकाळी ही घटना घडली आहे. तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाळूचा लिलाव मयत चंद्रकांत जाधव यांना मिळाला होता. यामुळे जाधव यांच्या भावकीतील लोकांना राग आला. याच कारणावरुन दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर काहीवेळातच हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी जोरदार हाणामारी केली. यामध्ये दोन्ही गटातील लोकांनी तलवार आणि लाठ्या काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केला.

या हाणामारीमुळे गावात एकच खळबळ उडाली. या घटनेत विलास आणि चंद्रकांत यांना बेदम मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर विशाल जाधव, विश्वास जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे.