Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात राडा

उरळी कांचन/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी संपला. मात्र, निवडणूक प्रचार अंतीम टप्प्यात आला असतानाच लोणी काळभोरमध्ये निवडणूकीला गालबोट लागले. निवडणुकीच्या वादातुन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटात मंगळवारी (दि.12) मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी लोखंडी गज आणि लाकडी दाडक्याच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला केला. दोन्ही गटात सुरु असलेली हाणामारी सोडवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

या घटनेनंतर दोन्ही गटांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील 22 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीमध्ये दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर गटाच्या शुभम तात्यासाहेब काळभोर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अष्टविनायक पॅनेलचे प्रमुख प्रशांत दत्तात्रय काळभोर, राज उर्फ विशाल प्रताप काळभोर, गुरुदेव दत्तात्रय काळभोर, सौरभ दयानंद काळभोर, शुभम विलास काळभोर, वैभव आनंदा काळभोर, रोहीत गिरी, निलेश धोंडीबा काळभोर, शुभम प्रदीप क्षीरसागर व सिद्धेश्वर प्रदीप क्षीरसागर या 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तर प्रशांत काळभोर गटाच्या सौरभ दयानंद काळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्यासह युवराज रामचंद्र काळभोर, गणेश सुखदेव काळभोर, नितिन ज्ञानोबा काळबोर, आदित्य तुपे, किशोर मदणे, सीताराम लांडगे, सुभाष काळभोर, प्रविण काळभोर, अमित काळभोर, शुभम काळभोर या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी (दि.12) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाषानकर बागेत दोन्ही गटात मारहाण झाली. महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचे पाषानकर बागेत जनसंपर्क कार्यालय असून या कार्यालयावर प्रशांत काळभोर यांच्या समर्थकांनी हल्ला केला. यातून हा प्रकार घडला असल्याचा आरोप राहुल काळभोर गटाने केला आहे.

दोन्ही पॅनेललच्या प्रचार सभा रद्द
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले की, माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेल व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेल या दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी रात्री उशीरा हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून या भांडणाला नेमकी कोणी सुरुवात केली याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रचार सभांना परवानगी नाकारली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच पुढील काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांना गडबड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.