बारावीचे दोन विद्यार्थी बेपत्ता

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरमध्ये बारावीचे दोन विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत. बारावी परीक्षेचा क्रमांक कोठे आला, हे पाहण्यासाठी जातो, असे सांगून मंगळवारी बाहेर पडलेले दोन विद्यार्थी पुन्हा घरी परतलेच नाहीत. सौरभ सुहास घोदे (वय १८, रा. नागदेववाडी, करवीर) व पुष्पेंद्रसिंह झबरसिंह राजपूत (१८, रा. उत्तरेश्‍वर पेठ) अशी त्यांची नावे असून ते दोघे शाहूपुरीतील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होते. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी पुष्पेंद्रसिंह हा सौरभ घोदे याच्या घरी गेला. यावेळी सौरभची आई सुरेखा या घरी होत्या. दोघांनी त्यांना परीक्षेचे नंबर कोठे पडले आहेत ते पाहून येतो, असे सांगितले. सायंकाळपर्यंत दोघेही घरी परतले नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलही ‘स्विच ऑफ’ लागले. त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, ते मिळाले नाहीत. दरम्यान नातेवाईक व पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सायबर सेलकडे दोघांचे नंबर पाठविले आहेत. यावरून शोध सुरू आहे.

पुण्यातील विद्यार्थी बेपत्ता – पृथ्वीराज अखिलेश समाधान देशमुख ( वय-१७) हा विद्यार्थी पुण्यातील रास्ता पेठेतून बेपत्ता झाला आहे. एका इसमाने त्याला फूस लावून पळवून नेल्याची  तक्रार त्याच्या काकांनी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.