जयंत पाटलांच्या ‘जलसंपदा’त कुरबुर !

कोयनानगर/ सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मागील वर्षापासून राज्यातील जलसंपदा विभागातील (Water Resources Department) बदल्यांचे चक्र थांबले आहे. जलसंपदा विभागातील तब्बल 286 अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा (Vacancies) आहेत. याचा फटका राज्यातील मोठमोठ्या प्रकल्पांना बसत आहे. या विभागातील कार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता सध्या ‘वेटिंग’वर आहेत. राज्याच्या विकासात मोठा वाटा उचलणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या मुख्य अभियंता (Chief Engineer) आणि कार्यकारी अभियंता (Executive Engineer) ही दोन प्रमुख पदे रिक्त असून शासनाचे (Government) याकडे दुर्लक्ष त्याला कारणीभूत ठरत आहे.

अनेक वर्षापासून शासनाच्या जलसंपदा विभागात भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे या विभागातील पन्नास टक्के पदे रिक्त आहेत. या पदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. अतिरिक्त पदभारामुळे अधिकारी वर्गावर प्रचंड ताण आहे. त्यातच जलसंपदा विभागातील वेगवेगळ्या संवर्गातील 286 अभियंत्यांची बढती प्रक्रिया रखडली आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता ते मुख्य अभियंता या पदांचा समावेश आहे.

अधिकारी वर्गात नाराजी
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने दिवाळीपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध संवर्गातील 250 अभियंत्यांचे पदोन्नतीचे आदेश काढले. मात्र जलसंपदा विभागातील अभियंत्यांना डावल्याने पदोन्नती मिळणाऱ्या जलसंपदा विभागातील अधिकारी वर्गात नाराजी पसरली आहे. दिवाळीपूर्वी जलसंपदा विभागातील बढती मिळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बढती देण्यात येईल, असे आश्वासन देणाऱ्या जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant Patil यांचे हे आश्वासन ‘बोलाची कढी व बोलाचाच भात’ ठरले आहे.

286 पदे बढतीच्या प्रतीक्षेत
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जलसंपदा विभागातील मुख्य अभियंता ते महासंचालकाची चार पदे, अधीक्षक अभियंता ते मुख्य अभियंत्याची चार पदे, कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंत्याची आठ पदे, उपविभागीय अभियंता ते कार्यकारी अभियंत्याची 58 पदे, कनिष्ठ अभियंता ते उपविभागीय अभियंत्याची 212 पदे अशी एकूण 286 पदे बढतीच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून या नियुक्त्या रखडल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर यांनी सांगितले.