केडगावच्या बाजारपेठेत दोनशे रुपयांच्या नकली नोटा

दौंड | पोलीसनामा आॅनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोनशे रुपयांच्या नकली नोटा आढळून येत असून या नकली नोटा हुबेहूब खऱ्या नोटेसारख्या दिसत असल्याने नागरिकांची मोठी फसगत होत आहे.

काल सोमवारी एक किराणा मालाचा व्यापारी आपली दुकानात जमा झालेली रक्कम एका खाजगी बँकेत जमा करायला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँक कॅशिअर मशीनमध्ये नोटा मोजताना त्यास हि नोट नकली असल्याचे समजले या नोटेचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर या नोटेतील मध्यभागी असणारी पट्टी हि अस्पष्ट आणि चमक नसलेली आढळून आली यावरून ही नोटे कलर झेरॉक्स असल्याचे  उपस्थितांनी सांगितले.

सिंचन घोटाळा : पाच आरोपी दोषमुक्त, एसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह

२०० रुपयांच्या नकली नोटा बाजारात आल्याने सर्वसामान्यांच्या सण उत्सवावर विरजण पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या दिवाळी निमित्त ग्राहकांतर्फे कपडे, किराणा, घरातील शोभनीय वस्तूंच्या खरेदी तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता बाजारपेठेत ग्राहकांची एकच गर्दी होत आहे. त्यामुळे घाई गरबडीमध्ये चलनात असणाऱ्या या नकली नोटा तपासण्याकडे ग्राहक आणि दुकानदार दुर्लक्ष करीत आहेत आणि यामुळे याचा मोठा फटका हा दुकानदार आणि ग्राहकांना बसत आहे.

२०० रु.च्या नोटेची हुबेहूब रंगीत प्रिंट करून ही नोट चलनात आणली गेली आहे. ती अश्या धामधुमीत ओळखणे कठीण आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात  सर्वसाधारण ग्राहकांना या बनावट नोटांचा फटका बसू नये या अनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या केडगावच्या बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येथील नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.