पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद; आज पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

सुंदरबनी : वृत्तसंस्था
पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सुंदरबनीजवळ केलेल्या या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी सडेतोड उत्तर दिले.

पाकिस्तानकडून छोटी शस्त्रे, अॅटोमॅटिक उखळी तोफांचाही हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. सुंदरबनीजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला.

दोन्ही कडून झालेल्या या गोळीबारात विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. या दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. विनोद सिंह जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील खेती दानापूर येथील रहिवासी होते. तर रायफलमॅन असलेले जाकी शर्मा हे जम्मूच्या संहैल गावचे रहिवासी होते.

 

You might also like