पुणे : गुरुवार पेठेतील सिलेंडर पेटल्याने मायलेक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक येथील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलेंडर पेटल्याने आग लागून त्यात मायलेक भाजल्याची घटना घडली. ही घटना सकाळी ८ वाजता घडली. अनुपमा किशोर जोशी (वय ५५) आणि हेमांशु किशोर जोशी (वय ३०) अशी भाजलेल्या दोघांची नावे आहेत.

शितळादेवी चौकातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जोशी यांचे घर आहे. आज सकाळी अनुपमा जोशी या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यांचा सध्या चालू असलेला सिलेंडर संपत आला आल्याचे त्यांना जाणवले. तेव्हा त्यांनी आपला मुलगा हेमांशु यांना सांगितले. हेमांशु हे दुसरा सिलेंडर लावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी दुसऱ्या सिलेंडरची कॅप काढल्याबरोबर हा दुसरा सिलेंडर पेटला. त्यामुळे त्यात ते दोघे भाजले. त्यांनी तातडीने हा सिलेंडर किचनमधून हॉलमध्ये ढकलला.
या आगीत दोघांच्या हाताला व चेहऱ्याला भाजले आहे. किचन व हॉल मधील काही वस्तू या आगीत जळाल्या.

अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घरात प्रवेश करुन सिलेंडरची आग विझवून दोघा जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, चंदनगर भाजी मार्केटमधील हनुमान मंदिराजवळ मध्यरात्री एका कपड्याच्या दुकानाला आग लागली होती. अग्निशामक दलाने दुकानाचे शटर उचकटून पाण्याचा मारा करुन ही आग विझविली.