D. Y. Patil कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ‘इराणी’ विद्यार्थ्यांना ९ लाखांचा ‘गंडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने इराणी विद्यार्थ्यांना ९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकगरणी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणाविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सबाह बहाम नौबखत (वय २१, सध्या रा. उंड्री, मूळ रा. इराण) या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शोएब रेजा नियाज हैदर सैय्यद (वय ३०, रा. दोराबजी पॅराडाईज सोसायटी) याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबाह आणि तिचा मित्र सैय्यद डॅनियल सय्यदगद हसन शरिफिअन हे पुण्यात शिक्षणासाठी आले आहेत. त्यांना पिंपरीतील डी. वाय. कॉलेज ऑफ फार्मसीत त्यांना डी. फार्मसीला प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी एका परिचितामार्फत सबाहची शोएबशी ओळख झाली होती. त्याने वर्षभरापूर्वी सबाह आणि तिच्या सहकाऱ्याला डी. फार्मसीला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्या दोघांकडून त्याने प्रत्येकी साडेचार लाख रूपये घेतले. लवकरच मिळाल्याबाबतचे पत्र देण्यात येईल, असे सांगितले. मात्र मागील वर्षभरापासून शोएब त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतो. तसेच त्याने दोघांना प्रवेश मिळवून न देता फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सबाहने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एच. पाडवी तपास करत आहेत.