Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसच्या निदानासाठी ‘मुंबई’ आणि ‘नागपुर’मध्ये प्रयोगशाळा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसच्या निदानासाठी मुंबई आणि नागपूर येथे विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि यासाठी भारतीय आयुर्विज्ञान न संशोधन परिषदेने मान्यता देखील दिलेली आहे. त्यामुळे या विषाणूग्रस्त लोकांना मुंबई आणि नागपूरला हलवण्यात येईल. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की राज्यात नव्याने चार जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून आतापर्यंत २१ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचे निदान करण्याकरीता राज्यात सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे रुग्णालयात दाखल झालेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. आरोग्य विभागाने मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात देखील या प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात निर्णय घेतला त्यामुळे स्थानिक रुग्णालयात दाखल झालेल्यांची प्राथमिक स्तरावरील चाचणी तेथेच होण्यास मदत झाली आहे.

राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी सर्व २१ जणांचे तपासणी अहवाल हे निगेटिव्ह आल्याचे एन.आय.व्ही. कडून सांगण्यात आल्याने त्या सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले. दरम्यान आज राज्यात अजून ४ नवीन संशयित प्रवाशांना भरती करण्यात आले यापैकी ३ जण हे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती झाला आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे.

राज्यातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत जवळपास १२ हजार ९९ प्रवाशांना तपासण्यात आले आहे. त्यापैकी बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १९९ प्रवासी आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ११९ प्रवाशांपैकी ४० जणांचा १४ दिवसांचा आरोग्य विषयक विचारपूस करणारा पाठपुरावा पूर्ण झाला असून इतर प्रवाशांचा पाठपुरावा अजून सुरु असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.