गडचिरोलीत दोन लाख रुग्णांनी घेतला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील प्रत्येक नागरिक सुखी, संपन्न व्हावा, यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना व प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात दोन लाख रुग्णांना या योजनेचा लाभ होईल व असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजनेंर्गत ६० वर्षानंतर कामगारांना तीन हजार रुपये निश्चित पेन्शनचा लाभ होईल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीएलई प्रतिनिधींच्या आयोजित कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, भविष्य निर्वाह निधीचे सतीश मेश्राम, निरज सिन्हा, शल्य चिकीत्सक डॉ. अनिल रुडे उपस्थित होते. आरोग्य हीच खरी संपत्ती असल्यामुळे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ठ असलेल्या १३५० आजारांवर आता शासन पाच लाख रुपयापर्यंतचे औषधोपचार करणार आहे. कुटुंबातील चार जणांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्यामुळे प्रत्येकाने गोल्डन कार्ड तयार करून घ्यावेत, योजनेत सहभागी होण्यासाठी आजच आपल्या जवळील सी.एस.सी. सेंटरवर जाऊन मोबाइल नंबर, आधारकार्ड, बँक पासबुकसह भेटा व व्हीएलई प्रतिनिधींना भेटून नॉमीनल शुल्क भरून कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे व शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनीही उपस्थित व्हीएलई प्रतिनिधींना मार्गदशनपर भाषण देऊन माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा आणि सामजिक कर्तव्य म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडावी, असे ते म्हणाले. संचलन नासीर हाशमी तर आभार निलेश कुंभारे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी जिल्ह्यातील व्हीएलई प्रतिनिधी उपस्थित होते.