पुण्यात येमेनी नागरिकाला लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीच्या उपचारासाठी पुण्यात आलेल्या येमेनच्या रहिवाशाला पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांनी झडती घेत त्याच्याकडील २ लाख १ हजार रुपये किंमतीचे परदेशी चलन लंपास केले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कौसबाग येथे घडली. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी येमेनी नागरिक अब्दुल करीम अलमेरी (५४, कौसरबाग, कोंढवा, मुळ येमेन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल करीम अलमेरी हे येमेनचे रहिवासी आहेत. भारतात चांगले उपचार मिळतात म्हणून अनेक परदेशी नागरिक भारतात येतात. विशेष करून त्यांची पुण्याला पसंती असते. त्याचप्रमाणे आपल्या बहिणीवर उपचार करण्यासाठी अलमेरी पुण्यात आले होते. त्यांच्या बहिणीवर जहांगीर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. उपचार अनेक दिवस चालणार असल्याने त्यांनी कोंढव्यातील कौसरबागेत एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. ते तेथे राहण्यास आहेत.

रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते कौसर बाग येथून पायी जात होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करून कोठून आला, कुठे चालला आहेस, अशी विचारणा केली. तसेच त्यांच्याकडे अंमली पदार्थ आहेत का असे विचारून अलमेरी यांना तुमची झडती घ्यायची आहे असे सांगितले. त्यांची झडती घेण्यासाठी जवळच्या सर्व वस्तू काढून घेतल्या. त्यासोबतच पैसेही काढून घेतले आणि ते परत दिले. त्यांनी पैसे आणि कागदपत्रे घेतली आणि पुढे गेले. तेव्हा त्यात त्यांच्याकडे दिलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ भारतीच चलनाचे पैसे त्यात होते. परंतु परदेशी चलनातील नोटा गायब होत्या. त्या नोटांची भारतीय चलनातील किंमत २ लाख १ हजार ८२५ रुपये आहे. यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकश कर्चे करत आहेत.