जम्मू-काश्मीर : चकमकीत 3 ‘दहशतवादी’ ठार, अजून काही जण लपल्याचा ‘संशय’, सर्च ऑपरेशन जारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांना ठार केले. परंतु, मृत्यू झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. यापूर्वी हर्दमांगुरीच्या खुर बाटपोरा भागात दहशतवादी लपून असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी 34 राष्ट्रीय रायफल्स (RR) यांच्यासह परिसरात शोधमोहीम राबविली. शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा जवानांना दहशतवाद्यांचा सामना करावा लागला, त्यानंतर दोन्ही बाजूंकडून गोळ्या झाडण्यात आल्या. आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजून दोन ते चार दहशतवादी तिथे लपले असल्याचा संशय आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांनी सर्व बाजूंनी परिसर घेरला आहे. या क्षणी ते उर्वरित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी दबाव आणत आहे.

दहशतवाद्यांनी दोन नागरिकांचा घेतला बळी

मिळालेल्या माहितीनुसार, हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी बुधवारी रात्री उशिरा कुलगाममध्ये दोन नागरिकांना गोळ्या घालून ठार केले. यानंतर परिसरातील सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविली जात होती. नंदीमर्ग येथील रहिवासी असलेल्या सिराज अहमद गोरसे आणि गुलाम हसन वागे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

15 मार्च रोजी अनंतनाग येथे एन्काऊंटर

यापूर्वी 15 मार्च रोजी सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये 4 दहशतवाद्यांना ढेर केले गेले. ठार झालेले चार दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाचे होते. अनंतनाग येथे झालेल्या या चकमकीत हिजबुलचा कमांडर तारिक अहमद मारला गेला.

9 मार्च रोजी देखील झाले होते एन्काऊंटर

याआधी 9 मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले होते. रेबेने ख्वाजापोरा येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये ही चकमक घडली. सैन्य, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांना दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.