पुणे : बनावट सॅनिटायझर प्रकरणात मुंबईतल्या दोघा उत्पादकाना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात बनावट सॅनिटाझर विक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने मुंबईतील कारखान्यावर छापा टाकत दोघा उत्पादकांना अटक केली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी सिनर्जी हायजेनिक कॉर्पोरेशनचे संचालक पराग दोशी आणि हरेश बेरा यांना अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी पुण्यात अजय शंकरलाल गांधी (वय ३९, रा. मस्तानीबाग अपार्टमेंट, शिवदर्शन), मोहन वाघाराम चौधरी (वय ३६, रा. शास्त्रीनगर, येरवडा), सुरेश प्रेमजी छेडा (वय ३९, रा. शनिवार पेठ) यांना पकडले होते. या तिघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

कोरोनामुळे शहरातील औषध विक्रेत्यांकडून सॅनिटायझर्स तसेच मास्क खरेदीसाठी नागरिकांची गर्दी केली जात आहे. त्याचा गैरफायदा घेऊन बनावट सॅनिटायझर्स बाजारात विक्रीसाठी आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

नामवंत सॅनिटायझर्स उत्पादक कंपनीच्या वेष्टनाचा (लेबल) वापर करून त्यात निकृष्ट प्रतीचे बनावट सॅनिटायझर भरले जात होते. गुन्हे शाखेने या प्रकरणात गांधी, चौधरी आणि छेडा यांना अटक केली. निकृष्ट सॅनिटायझरचा पुरवठा करणाऱ्या मुंबईतील उत्पादक दोशी आणि बेरा यांनी केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दोघांना मुंबईतून अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्या पथकाने केली.