अडीच लाखांची लाच घेताना महापालिकेचे २ सुपरवायझर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टेरेसवर केलेले बेकायदार बांधकाम पाडू नये, यासाठी साडेतीन लाखांपैकी अडीच लाख रुपये घेताना महापालिकेच्या २ सुपरवायझर व मुकादमला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. महेश कांबळे, धीरज कांबळे (सुपरवायझर, इमारत व कारखाने विभाग, सी वॉर्ड, मुंबई) व चंद्रकांत महादेव कांबळे (वय ५७, रा मुकादम, इमारत व कारखाने विभाग, सी वॉर्ड, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे रहात असलेल्या टेरेस फ्लॅटच्या ओपन टेरेसवर खासगी काँट्रँक्टरकडून शेड, ग्रिल व भिंतीचे बांधकाम केले होते. या बांधकामापैकी काही भाग महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयाकडून पाडण्यात आला होता. त्यानंतर जून २०१८ मध्ये महापालिकेचे दोन कर्मचारी तक्रारदारांच्या घरी आले. व त्यांनी उर्वरित बांधकाम पाडायचे नसल्यास २ इंजिनिअर व संबंधित कर्मचारी यांना मॅनेज करावे लागेल. त्यासाठी तक्रारदारांकडून सुरुवातीला ५० हजार व नंतर साडेतीन लाखांची मागणी करण्यात आली.
तक्रारदारांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी दरम्यान या सुपरवायझरांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३१ ऑक्टोंबर २०१८ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर दोन्ही सुपरवायझरच्या वतीने मुकादम चंद्रकांत कांबळे यांनी ११ एप्रिल रोजी तक्रारदारांकडे साडेतीन लाखांची मागणी केली. त्यापैकी अडीच लाख घेताना कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.