थर्टी फस्ट ! नागपूरमध्ये झाले दोन खून ; सामान्य लोकांनीच ठार केला गुंड 

नागपूर  : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरमध्ये  नववर्ष स्वागताच्या दरम्यान घडलेल्या वादात एका गुंडाचा आणि अन्य एकाचा अशा दोघांचा खून झाला आहे तसेच एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही पैकी पहिली घटना हि इमामवाडा परिसरात घडली असून दुसरी घटना औद्योगिक वसाहतीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनांमुळे  नागपूरच्या नववर्षाच्या उत्सवात तणाव पसरला आणि नववर्षाचा जल्लोष कमी झाला. मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नागपूर मध्ये अशा घटना घडल्याने राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभा राहिले आहे.

नागपूरमधील गुंडगिरीच्या बातम्या सतत माध्यमातून झळकत असतात. नागपूरातील गुंडगिरी राजकारण्यांना हवी आहे का असा हि प्रश्न नागरिकांकडून दबक्या आवाजात विचारला जातो. खूनाची पहिली घटना औद्योगिक वसाहतीच्या पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून राजीव नगर या परिसरात परिचित असणारा कुख्यात गुंड रणजीत लडी असे त्या गुंडांचे नाव आहे. रणजीत लडी हा राजीव नगर भागात लोकांना लूट मार आणि हप्ता वसुलीचे काम करत होता. त्या परिसरात त्याच्या जुलमाला लोक कंटाळून गेले होते. त्याचा काटा काढण्याचे परिसरातील लोकांनी ठरवले आणि त्यांनी थर्टी फस्टच्या सेलेब्रेशन मध्ये या गुंडाचा खून केला आहे. तसेच त्याचा साथीदार ज्याने हा खूनाचा विरोध केला तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे रात्री इकडे नववर्ष सुरु होण्याचा आणि त्या गुंडाचा खून  होण्याचा एकच वेळ होता. म्हणजे रात्री बारा वाजता खून करणे हा कटाचा भाग होता का असा अंदाज वर्तवला जातो आहे.

दुसरी घटना इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून आकाश वाघमारे नामक तरुणाची तीन ते चार तरुणांनी हत्या केली आहे. सदरची हत्या नववर्षाच्या स्वागता दरम्यानच्या सेलिब्रेशन कार्यक्रमात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली असून ते पुढील तपास करत आहेत. नागपूरात घडलेल्या प्रकरणामुळे नागपूरच्या नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमला गालबोट लागले आहे. नववर्ष स्वागतासाठी नागपूरात चोख पोलीस बंदोबस्त असताना देखील अशे प्रकार घडल्याने नागपूर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह उभे राहू लागले आहे.