Coronavirus : ‘पश्चिमची वॅक्सीन आपला कोरोनापासून बचाव करेल’ असं विचार करणं ‘मुर्खपणा’, नोबेल विजेत्यानं सुचवला उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पण जर लस घेतल्याने कोरोना म्युटेशन्सपासून सुटका मिळणार असे वाटत असेल तर हा मूर्खपणा असल्याचा इशारा नोबेल पुरस्कार विजेता इकोनॉमिस्ट्सने दिला आहे.

डॉक्टर अभिजीत बॅनर्जी आणि त्यांची फ्रेंच इकोनॉमिस्ट पत्नी डॉक्टर इस्थर डुफलो यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या एका ओपिनियन आर्टिकलमध्ये म्हटले, की जगभरातील नेते आणि शास्त्रज्ञांना कोरोना वेरियंटवर गंभीर राहणे गरजेचे आहे. त्याला रोखण्यासाठी बुस्टर शॉट्स, नवी लस आणि मास्क घेऊन तयारी करणे गरजेचे आहे. याशिवाय लॉकडाऊनच्या मुद्यावरून रणनीतिही आवश्यक आहे. लसीकरण झाल्यानंतरही आपण कोरोनापासून पूर्णपणे वाचू शकतो हे सांगता येत नाही.

युरोप, अमेरिका आणि भारत सरकारने धडा घेणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय स्तरावर रणनीति आखणे गरजेचे आहे. B.1.617 कोरोना वेरियंट आता भारताबाहेरही गेला आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही अनेक लोक बाधित झाले आहेत. तसेच पश्चिमी देशांत टॉप क्लास लस घेतल्यानंतर ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मानल्यास ते धोकादायकही ठरू शकते.

जेव्हा भारतात कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तेव्हा देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही जास्त नव्हती. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा दबाव पडलेल्या भारत सरकारने लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात केली. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताला विळख्यात पकडले. तोपर्यंत देशात बेजबाबदारपणा दिसला. भारतासारख्या देशात जास्त इन्फेक्शन ठिकाणी लॉकडाऊनचा विचार करावा. त्यातून गरीबांसाठी आणि मध्यमवर्गासाठी कॅश ट्रान्सफर सुविधा देण्यावर विचार करावा.