वर्गमित्र असलेले बीडचे 2 अधिकारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन तरुण अधिकाऱ्यांना लाचलुपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे लाच घेताना पकडण्यात आलेले दोन्ही अधिकारी वर्गमित्र आहेत. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांची चर्चा सध्या सुरु आहे. श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ असे लाच घेताना रंगहेथ पकडण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी आहेत. तर मिसाळ हे पाटोदा आणि बीड पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूची गाडी चालू ठेवण्यासाठी 65 हजार रुपयांची लाच स्विकारली. गायकवाड यांनी आपल्या चालकामार्फत ही लाच स्विकारली. गायकवाड यांना पकडण्याच्या एक दिवस आधी त्यांचे वर्गमित्र असलेले नारायण मिसाळ यांना विहिरीच्या मंजुरीसाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते.

नारायण मिसाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्यानंतर उपजिल्हाधिकारी असलेले श्रीकांत गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर त्यांनी थेट माजलगाव गाठले. या ठिकाणी त्यांनी चालकामार्फत 65 हजार रुपयाची लाच स्विकारली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना देखील लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिसाळ आणि गायकवाड हे दोघे वर्गमित्र असून सध्या ते एसीबीच्या ताब्यात आहेत. सलग दोन दिवस झालेल्या एसीबीच्या कारवाईत दोन बडे अधिकारी सापडल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.