वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच घेणारे ‘ते’ दोन ‘पंटर’ जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस कर्मचारी असल्याचे भासवत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळणारे २ पंटर १ लाख ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. अन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना चिखली येथील हॉटेल श्री परिवार येथे सापळा रचून रंगेहात पकडले.

अमित रमेश मोहीते (वय २४, रा. साने कॉलनी,  मोरे वस्ती चिखली, पुणे), अर्जुन अच्छेलाल विश्वकर्मा(  वय २८, रा.दगडू पाटील नगर, काळेवाडी, वाकड,पुणे) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकऱणी ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

अमित मोहिते व अर्जून विश्वकर्मा या दोघांनी तक्रारदार यांना ते पोलीस असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोहननगर येथील क्राइम युनीट कडे तक्रार दाखल असल्याची भीती दाखवली. ते प्रकरण मिटवायचे असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यासाठी १ लाख ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदाराने यासंदर्भात अन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर अन्टी करप्शनच्या पथकाने याची पडताळणी केल्यावर त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा लावला. त्यावेळी दोघांना ३२ हजार रुपये रोख ७४ हजार रुपयांचा बेअरर चेक अशी १ लाख ६ हजार रुपयांची लाच घेताना चिखलीतील साने चौकात असलेल्या हॉटेल श्री परिवारमध्ये रंगेहात पकडण्यात आले.दरम्यान हे दोघे नेमके कोणत्या अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळत होते. तसेच त्यात पोलीस दलातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा समावेश आहे का याचा तपास अॅन्टी करप्शनच्या पथकाकडून सुरु आहे.

एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यासंदर्भात अन्टी करप्शन विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनशाम बळप, सहायक पोलीस फौजदार करूणाकर, कर्मचारी टिळेकर, गिरीगोसावी, मेहत्रे याच्या पथकाने केली.