जलीकट्टू खेळात सर्वाधिक वळू उतरविण्याचा विश्वविक्रम ; दोघांचा मृत्यु ३१ जखमी

पुदुकोट्टाई : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या पुदुकोट्टाईमध्ये रविवारी जलीकट्टू या पारंपरिक खेळात सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. राम आणि सतीश अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. खेळात सहभागी झालेले असताना वळूने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तमिळनाडूचे आरोग्य मंत्री विजयभास्कर यांच्या वतीने वीरालिमलई येथे या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये जवळपास १ हजार ३४५ वळूंचा सहभाग नोंदवण्यात आला. ज्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे ४२४ स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला होता. या खेळात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

वर्ल्डकिंग्स वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जवळपास दुपटीने वळूंची संख्या पाहायला मिळत आहे. याआधी  १६ जानेवारी रोजी शिवागंगाई जिल्ह्यात जलीकट्टू खेळाचे आयोजन करण्यात आले होते.