पुणे जिल्ह्यातील दोघांना नगरला लुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्वस्तात सोन्याच्या आमिषाने पुणे जिल्ह्यातील दोघांना नगर शहराजवळ लुटण्यात आले. रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 3 लाख 15 हजार रुपयांना लुटले. नगर दौंड रस्त्यावरील जाधववस्ती जवळील गॅस गोडाऊनपासून काही अंतरावर ही घटना घडली. घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

याप्रकरणी राजू कांबळे व त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध (पूर्ण नावे माहीत नाहीत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, योगेश बबन केदारी (रा. कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांना कांबळे याने सांगितले की, ‘ आमच्याकडे सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली तांब्याची घागर सापडली आहे. ते सोने स्वस्तात देतो.’ स्वस्तात मिळत असल्याने सोने खरेदी करण्यासाठी केदारी हे त्यांचे जोडीदार शिवाजी गायकवाड यांच्यासमवेत 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नगरला आले. त्यांना कांबळे याने नगर-दौंड रस्त्यावरील गॅस गोडाऊनजवळ जाधववस्ती पासून काही मीटर अंतरावर बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर कांबळेसह इतर तिघांनी केदारी व गायकवाड यांना मारहाण करून त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम, 58 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तब्बत 10 दिवसानंतर योगेश केदारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे करीत आहेत.

लोकसभा निवडणूक : अमित शहा यांचा पुणे दौरा निश्चित
धक्कादायक ! आईसह ४ वर्षाच्या मुलीचा गळा चिरून खून
खुशखबर ! घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत होणार घट