कोविड अधिकारी असल्याचे सांगून 54 हजार लुटले, मुंबईत तोतया अधिकारी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला 54 हजार रुपयांना लुटल्या प्रकरणी मुंबईच्या चेंबूर भागातून एका हिस्ट्रिशीटर गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाच्या नावाखाली लुटमार होत असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, अब्दुल शेख ही व्यक्ती 30 जून रोजी चेंबूर रेल्वे स्थानकात जात होती. त्यावेळी सोहन वाघमारे (वय-23) आणि त्याच्या आणखी साथिदार यांनी आपण कोविड अधिकारी असल्याचे सांगितले.

अब्दुल शेख यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. चेंबूर पोलिसांनी सांगितले की, वाघमारे आणि त्याच्या साथीदाराने शेख यांची बॅगेची तपासणी करणाच्या बहाण्याने त्याचे एटीएम कार्ड चोरले. तसेच त्यांच्या एटीएम कार्डचा पीन नंबर मिळवला. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या एटीएम कार्डद्वारे 54 हजार रुपये काढून घेतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपसण्यात आले.

त्यावेळी आरोपींच्या कारचा क्रमांक मिळाला. त्यानंतर वाघमारे याला शुक्रवारी चुनाभट्टी येथील घरातून अटक करण्यात आली. तर त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाघमारे याच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सायन आणि नेहरु नगर पोलीस ठाण्यात इतर गुन्हे दाखल आहेत.