ट्रकच्या धडकेने पादचारी पुलाचा ‘सांगाडा’ कोसळून 2 जण जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील घाटकोपर -मानखुर्द लिंक रोडवर ट्रकची धक्का लागल्याने पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला. या घटनेत दोघे जण जखमी झाले. तसेच चार गाड्यांचा चुराडा झाला आहे. ही घटना गोवंडीजवळच्या बैंगनवाडी सिग्नलवर पहाटे दोन वाजता घडली.

घाटकोपर -मानखुर्द लिंक रोडवर सुरु असलेल्या महापालिकेच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी एक ट्रक सिमेंटचा मोठा खांब घेऊन चालला होता. त्या ट्रकचा धक्का पुलाखाली असलेल्या सांगाड्याला लागला. त्यामुळे हा सांगाडा थेट घाटकोपर – मानखुर्द लिंक रोडवर कोसळला. या अपघातात ट्रकचा चालक आणि आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

ही घटना घडली त्यावेळी पुलाखाली दोन वाहने उभी होती. या घटनेत ट्रक, बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षा आणि टेम्पो चिरडला गेला. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. क्रेनच्या सहाय्याने सांगाड्याचा हा मलबा दूर करण्यात आल्यानंतर आता सकाळी या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात पोलिसांना यश आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –