भरधाव बसच्या धडकेत २ ठार

बिलोली (नांदेड ) : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी बसची धडक दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन जणांचा मृत्यू झाला. एकाचा जागेवरच मृत्यू  झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी नांदेड-देगलुर रोडवर आठच्या सुमारास झाला.

फेरोज बाबु सय्यद (वय – २०) याचा जागीच मृत्यू झाला तर हुशेन अमीरसाब सय्यद (वय-५० रा. भोपाळा, नायगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फेरोज आणि हुशेन हे दोघे नांदेड-देगलुर रोडने मोपेडवरुन जात होते. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी बसची धडक त्यांच्या गाडीला बसली. यामध्ये ते दोघे बसच्या पुढील चाकाखाली आले. यात गंभीर जखमी होऊन फेरोज याचा जागीच मृत्यू झाला. हुशेन यांना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. अपघातामुळे या ठिकाणी काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतुक सुरळीत केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.