नगर-पुणे रस्त्यावरील भीषण अपघातात दोघे ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर-पुणे रस्त्यावरील कार व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. आज रात्री सुपा एमआयडीसी चौकाजवळ हा अपघात झाला.

मयत झालेल्यांमध्ये गुलाब शंकर पवार (वय 56), मोहन उत्तमराव पवार (वय 50, दोघे रा.सुपा, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर-पुणे रस्त्यावरील सुपा एमआयडीसीजवळ भरधाव वेगातील मोटारसायकल (क्र. एमएच 16, बीजे 4030) व होंडा कारची (क्र.एमएच 16 बीसी 1402) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नगर-पुणे रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत भोसले यांच्यासह पोलिस फौजफाटा तातडीने अपघातस्थळी दाखल झाला. मयतांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णवाहिकेतून पारनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. रस्त्यावरील कार बाजूला करून सुपा पोलीस ठाण्यात नेण्यात आली. त्यानंतर नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.