सियाचीनमध्ये 18 हजार फुटांवर हिमस्खलन, दोन जवान शहीद

सियाचीन : वृत्तसंस्था – दक्षिण सियाचीन ग्लेशिअरमध्ये सुमारे 18000 फूट उंचीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर आज (शनिवार) पहाटे हिम कडा कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये दबलेल्या गस्ती पथकातील जवानांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने हेलीकॉप्टरच्या मदतीने काम सरु केले आणि जवानांना बाहेर काढले. या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला.


सियाचीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिमवादळ सुरु आहे. या प्रतिकूल परिस्थितीत सेवा बजावत असतानाच आज पुन्हा एकदा दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. गस्ती पथकावर हिमकडा कोसळ्याची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व जवानांना बर्फाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. या सर्वांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती जवान अडकले होते, याचा तपशील अद्याप मिळालेला नाही.

एका आकडेवारीनुसार 1984 पासून आत्तापर्यंत हमस्खलनाच्या घटनांमध्ये भारतीय लष्करातील 35 अधिकारी व 1 हजार पेक्षाही अधिक जवानांचा मृत्यू झाला आहे. 2016 मध्ये मद्रास रेजिमेंटचे जवान हणमंथप्पा यांच्यासह 10 जवानांचा मृत्यू झाला होता. हणमंथप्पा हे तब्बल सहा दिवस बर्फाच्या खाली आकडले होते. त्यांना जीवंत बाहेर काढण्यात आले होते. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 11 दिवसांपूर्वीच म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांचा मृत्यू झाला होता.

Visit : Policenama.com