वेळापूर येथे टिपरखाली येऊन मोटरसायकलवरील 2 ठार तर एक गंभीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पालखी मार्गाच्या कामावरील एस. एम. आवताडे कन्स्ट्रक्शन अँड कंपनीच्या टिपलखाली (एमएच 13 सीययू 1984 ) मोटारसायकल भीषण अपघात झाला. त्यात दोन तरुण ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची घटना वेळापूर (ता. माळशिरस) येथे सोमवारी तारीख सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

हा अपघात इतका भयानक होता की मृत तरुणांच्या मृतदेहाचे तुकडे घटनास्थळी विखुरलेले होते. वेळापूरच्या पूर्वेला उघडेवाडी- धानोरे रोड क्रॉसिंगवर हि घटना घडली. या अपघातात मोटारसायकलवरील तुषार शहाजी जाधव (वय 18) शाळकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर देवा बाबासाहेब माने (वय 28) याचा उपचाराला नेताना मृत्यू झाला. तर तिसरा तरुण धनंजय माने (वय 17 ) गंभीररीत्या जखमी असून अकलूज येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी आणि निषेधार्थ घटनास्थळी मृतदेह भोवती कडे करुन रोखून धरला. प्रत्यक्षदर्शी नातेवाईकांच्या मते एका पोलिस कर्मचाऱ्याने मोटारसायकलवरून केलेल्या पाठलागामुळे हे अपघातग्रस्त तरुण टिपरखाली आले. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतप्त नातेवाईकांचा जमाव वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये येऊन विना गणवेश पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरून पोलीस स्टेशनच्या समोरील अकलूज सांगोला रस्त्यावर ठिय्या धरला. वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं नातेवाईकांची मृतदेह उचलण्याची परवानगी दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अकलूज उपविभागीय अधिकारी धीरज राजगुरू यांनी वेळापूर येथे धाव घेऊन सूत्रे आपल्या हाती घेतली. वेळापूर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

You might also like