रेकॉर्डवरील सराईताकडून २ पिस्तूल व काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करून गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने त्याच्याकडून दोन पिस्तूले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

सम्या उर्फ समाधान सिकंदर राऊत (२१, नाना नानी पार्क, शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्यावर यापुर्वी कोथरुड पोलीस ठाण्यात चोरी, वाहनचोरीचे ३, घरफोडी १,  व विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनीट तीनचे पथक गस्त घालत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सम्या उर्फ समाधान राऊत हा एकलव्य कॉलेजजवळ येणार असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तूले, दोन जिवंत काडतुसे असा १ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला असून त्याने ज्याच्याकडून पिस्तूल विकत घेतले आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच त्याने कोणाला पिस्तूल विकले आहेत. किंवा त्याचे कोणी इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरु आहे.

ही कामगिरी प्रभारी अप्पर पोलीस आयुक्त ज्योती प्रिया सिंह, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, कर्मचारी मच्छिंद्र वाळके, प्रशांत पवार, सचिन गायकवाड, विल्सन डिसुजा, कैलास साळुंके यांच्या पथकाने केली.