‘या’ कारणामुळं पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेश जमादार पोलिस दलातून ‘बडतर्फ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये सहभागी होऊन बेकादेशीरपणे अधिक आर्थिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय चौकशीत आढळून आल्याने त्यामुळे पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस नाईक परवेज जमादार यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे.

अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी हा आदेश काढला आहे. पर्वती येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणात आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून शैलेश जगताप व परवेज जमादार यांना गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली.

नीलमणी देसाईच्या पर्वती येथील जमीन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या पदाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुरुपयोग केला. देसाई यांना मदत करण्यासाठी ऋषिकेश बारटक्के याच्याकडून रोख रक्कम स्वीकारली. तसेच लाईफ स्टाईल येथून ब्रॅडेड कपडे खरेदी केले. बारटक्के हा गुन्हेगार आहे, हे माहिती असताना त्याच्याशी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संबंध ठेवले. हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलीस दलाच्या शिस्तीच्या विपर्यस्त आहे, असे आरोप दोघांवर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते.

आपले भाऊ जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर मोका कारवाई केली. त्यामुळे आपल्याला या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा आरोप शैलेश जगताप यांनी केला होता. या मोका प्रकरणात दीपक मानकर यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विभागीय चौकशीत दोघांनी बारटक्के याला भेटायला गेल्याचे मान्य करुन बातमीसाठी गेलो होतो, असे सांगितले. कोणती बातमी याचा उल्लेख मात्र केला नाही. विभागीय चौकशीत दोघांना दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी या प्रकरणाचे अवलोकन केले. त्यांनी दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली. त्यांनी दोषारोप मान्य नसल्याचे सांगितले. तथापी त्यांनी त्याचे बचावार्थ कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तराव्यतिरिक्त कोणताही ठोस पुरावा सदर केला नाही़ अगर नवीन मुद्दा उपस्थित केला नाही.

त्यानंतर शुक्रवारी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी शैलेश जगताप आणि परवेश जमादार यांना खात्यातून बडतर्फ करण्याचा आदेश काढला आहे. शैलेश जगताप यांचे खबऱ्यांचे मोठे जाळे असून आतापर्यंत त्यांनी बेकायदा पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या १५० हून अधिक गुन्हेगारांना पकडून दिले आहे. तसेच अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक नायजेरियन तरुणांना अमली पदार्थासह पकडून दिले असून त्यांना त्याबद्दल अनेक बक्षिसे मिळाली होती. परवेज जमादार यांनीही अनेक गुन्हे उघडकीस आणले असून त्याबद्दल त्यांना वेळोवेळी बक्षिसे देण्यात आली होती.

Visit : Policenama.com