लाच घेणारे २ पोलीस अधिकारी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी धडक मोहिम सुरु केली आहे. लाच घेताना सापळा रचून पकडण्यात आलेल्या तिघा पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गुरुवारी बोलावलेल्या एका विशेष बैठकीत पोलीस आयुक्तांनी लाचखोरीबाबत पुन्हा एकदा सर्वांना ताकीद दिली आहे.

कुलाबा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीमणिक होळकर आणि सागरे टकले यांनी तक्रारदार आणि आरोपी अशा दोघांकडून पैसे उकळले होते. याबाबत तक्रारी आल्यावर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत ते दोघेही दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.

होळकर आणि टकले यांना एका व्यावसायिकाने केलेली तक्रार खोटी असल्याचे माहिती होते. असे असतानाही या तक्रारीचा गैरफायदा घेत त्यांनी दुसऱ्या व्यावसायिकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. व कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये घेतले. तसेच तक्रार करणाऱ्याकडून दोघांनी ३० हजार रुपये घेतले. या दोन्ही व्यावसायिकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यावर या दोघांचे हे बिंग फुटले. आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच २५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले गोवंडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनाही निलंबित करण्यात आले. आरोप असलेल्या, तक्रारी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याचे धडक सत्र त्यांनी सुरूच ठेवले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्तांची विशेष बैठक पोलिस आयुक्तांनी गुरुवारी बोलवली होती. निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत चर्चा झाली. पोलिस दलात बेशिस्त वर्तन आणि लाचखोरीला बिलकुल थारा दिला जाणार नाही. त्यामुळे आपल्या अखत्यारीतील पोलिसांना समज द्या, असे सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.