Nashik News : समाजकंटकाकडून पोलिसांवर तुफान दगडफेक; 2 पोलिस जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –  शिवजयंती उत्सव पार पडल्यानंतर चारणवाडी येथील त्रिमूर्ती चौकातील गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही समाजकंटकानी केलेल्या तुफान दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. 19) ही घटना घडली. या प्रकरणी 14 आरोपीवर गुन्हा दाखल करून 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मनोहर साळुंखे आणि पंढरीनाथ आहेर अशी जखमी पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवजयंती उत्सवानिमित्त आहेर हे देवळाली पोलिस हदीत कर्तव्यावर होते. त्यावेळी संसरी येथील एकाचे चारणवाडी येथील एका व्यक्तीबरोबर भांडण झाले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही समाजकंटकाने दगडफेक केली. यात पोलीस नाईक आहेर यांसह पोलीस शिपाई साळुंखे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल करून प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी चारणवाडी येथून संशयित आरोपी शंकर सुरेश देवकर, श्रावण माने, रोहित कुसमाडे, दीपक नलावडे, गुंडाप्पा देवकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून उर्वरित 9 आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.