‘त्या’ 2 पोलिसांनी कैद्याला खासगी वाहनानं नेलं घरी, बोकडाचं जेवण पडलं चांगलच महागात, दोघांचे तडकाफडकी निलंबन

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन –  खुनातील आरोपी असलेल्या कैद्याला दवाखान्यात तपासणीकरिता म्हणून जेलमधून काढल्यानंतर आंबे ( ता. पंढरपूर) येथे बोकडाचा प्लॅन आखला. त्या मोहाने पोलिसांनी त्या कैद्याला खास गाडीने त्याच्या गावी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी ‘तो’ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आंबे गावासह मंगळवेढा पोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह कैद्याला जिभेचे चोचले पुरवणाऱ्या ‘त्या’ दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

मिळालेल्या माहिती अशी की, मंगळवेढा सबजेलमध्ये असलेल्या आरोपीच्या घरी १३ जुलै रोजी बोकड जेवणाची पार्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्या कैद्याला आपल्या घरी हजेरी लावण्याकरिता त्या दिवशी ड्युटीवर असलेले गार्ड बजरंग माने आणि उदय ढोणे या दोन पोलिसांनी पोटदुखीचे कारण दाखवून ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा बहाणा केला. नंतर दुपारी १२.३० च्या सुमारास कारागृहातील रजिस्टरला नोंद केल्यानंतर जेलबाहेर पडताच कैद्यास खाजगी वाहनाने थेट त्याच्या आंबे या गावातील घरी बोकड पार्टी करता नेण्यात आले.

बोकड जेवणावर ताव मारुन दोन तासांनी त्यांनी पुन्हा दुपारी २.३० वाजता मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे एक पोटदुखीची गोळी घेऊन परत जेलकडे रवाना झाले. पण दुसऱ्याच दिवशी पार्टीला गेलेला तो कैदी कारागृहातील कैद्यांच्या कोरोना तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आला आणि एकच खळबळ उडाली. त्याच्यासोबत जेवणासाठी हजर असणाऱ्या गावातील लोकांनी स्वतःहून घरीच क्वारंटाईन केल्याने ही चर्चा सर्व तालुक्यात झाली. आणि कैदी पार्टीचे बिंग फुटले.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील आणि पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी या प्रकरणाची एका दिवसात चौकशी करुन तात्काळ अहवाल अप्पर पोलिस अधीक्षक यांच्याकडे सादर केला. त्या अहवालाच्या आधारे पहिल्या टप्प्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पुढील टप्प्यात बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.