फिर्यादीकडूनच लाच घेणारे 2 पोलीस तडकाफडकी निलंबित, पोलीस दलात खळबळ

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात येण्याचा परवाना नसल्याने टेम्पोचालकाकडून कुलर तर बेपत्ता मुलीचा शोध घण्यासाठी 10 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या व सध्या शिरवळ येथील शिंदेवाडी चेकपोस्टवर तैनात केलेल्या पोलीस हवालदार जी.एन. घोटकर आणि फलटण पोलीस ठाण्यातील गुलाब गलीयाल अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पुण्याहून एक टेम्पो सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येत होता. त्यावेळी शिंदेवस्ती चेकपोस्ट परिसरात हवालदार जी.एन. घोटकर हे कर्तव्य बजावत होते. त्यांनी टेम्पो चालकाकडे सातारा जिल्ह्यात येण्याचा परवाना मागितला. त्यावेळी चालकाकडे सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीचा परवाना नव्हता. घोटकर यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात कुलर होते. घोटकर यांनी टेम्पोतील एक कुल द्या व पुढे शिरवळकडे जा, असे सांगून कुलर ठेवून घेत टेम्पो सोडला.

फलटण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गुलाब गलीयाल यांच्याकडे 22 जून रोजी बेपत्ता असलेल्या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. याप्रकरणी गलीयाल यांनी फिर्यादी यांची भेट घेऊन तुमची बेपत्ता झालेली मुलगी शोधून आणतो, असे सांगून त्यांनी 10 हजार रुपये घेतले. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंधित अहवाल पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर प्राथमिक माहिती घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घोटकर आणि गलीयाल या दोघांना निलंबित केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like