पुण्यातील 2 पोलीस तडकाफडकी निलंबित !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – औंध परिसरात चोरट्यांना पाहून पळून गेल्याची घटना ताजी असतानाच अशी एक घटना सिंहगड रोडवर घडली आहे. तडीपार गुंड रोशन लोखंडे याच्यासह त्याच्या साथिदारांनी हातात कोयते व पिस्तुल घेऊन नाच करत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड या दोघांना निलंबित केले आहे.

पोलीस शिपाई महेंद्र मोहन राऊत आणि सुशांत सतीश यादव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हा प्रकार नर्हेतील मानाजीनगर परिसरात 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास घडला होता. आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी हातात कोयते आणि पिस्तुल घेऊन नाचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील राऊत आणि यादव यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली नाही.

तडीपार गुंड रोशन लोखंडे याने नर्हेतील मार्तंड प्रतिष्ठान येथील सार्वजनिक रोडवर 15 साथिदारांसह रात्री 11 वाजता हातात कोयते, पिस्तुल घेऊन नाच केला. यामुळे व्यावसायिकांनी घाबरून आपली दुकाने बंद केली. पोलीस कर्मचारी राऊत आणि यादव हे नर्हे पोलिस चौकीत असताना त्यांना हा प्रकार समजला होता. ते घटनास्थळी गेले. परंतु त्यांना थांबण्याचा किंवा त्यांना पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. तसेच एवढा मोठ्या गंभीर प्रकाराची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली नाही.

तडीपार गुंडाने त्याच्या साथिदारांसह सार्वजनिक रस्त्यावर कोयते आणि पिस्तुल घेऊन नाच केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यानंतर या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना समजली. यानंतर पोलिसांनी आरोपी लोखंडे याच्यासह काही जणांना अटक केली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार राऊत आणि यादव यांना माहित असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दोघांना निलंबित केले.