CAB : पोलीस फायरिंगमध्ये दोघा आंदोलकांचा मृत्यु, पोलीस आयुक्तांसह 14 अधीक्षकांच्या बदल्या

गोहाटी : वृत्त संस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात संचारबंदी झुगारुन हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोघा आंदोलकांचा मृत्यु झाला. संपूर्ण गुवाहाटीसह आसाममध्ये अशांतता असताना मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी पोलीस आयुक्तांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

संसदेने बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. त्यानंतर ईशान्य भारतातील आंदोलन आणखी तीव्र होत गेले आहे. गुवाहाटीसह राज्यातील १० जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. चार विभागात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुवाहाटीशहरात संचारबंदी लागू असतानाही हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. पोलिसांची वाहने पेटविली जात होती. तसेच पोलिसांवर दगडफेक केली जात होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोघा जणांचा मृत्यु झाला.

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपककुमार यांची बदली करुन त्यांच्या जागी मुन्ना प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. त्याबरोबर अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या विधेयकाच्या विरोधात मेघालयात आंदोलन सुरु झाले आहे. त्यामुळे येथील इंटरनेट, एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. शिलॉगमध्येही या बिलाच्या विरोधात नागरिक संचारबंदी असतानाही रस्त्यावर उतरले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like