एटीएमला चकवा देऊन पैसे लुबाडणाऱ्या राजस्थानातील दोघांना पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्राहक म्हणून बँकेच्या एटीएम सेंटरला जाऊन एटीएम मशीन आणि बँक व्यवहाराला चकवा देऊन पैसे लुबाडणाऱ्या दोघांना गस्त घालणाऱ्या डेक्कन पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावरील एटीएममध्ये रंगेहाथ पकडले. एटीएम मशीनमध्ये छेडछाड करणाऱ्यांचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

वकिल नूरदिन खान (वय २२) आणि दिलसाद हारुन खान (वय २५, दोघेही रा. बिरजनगर, भरतपूर, राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. अशाप्रकारे काही महिन्यांपूर्वी कर्वे रोडवरील पेट्रोलपंपामध्ये असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करणाऱ्या हरियानाच्या दोघांना डेक्कन पोलिसांनी पकडले होते.

याप्रकरणी बँक ऑफ इंडियाचे अधिकारी रौफ रुस्तुम साहब मणियार यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बँक ऑफ इंडियाच्या जंगली महाराज रोडवरील एटीएममध्ये हे दोघे ग्राहक असल्याचे भासवून पैसे काढण्यासाठी आत गेले. त्यांच्याकडे अ‍ॅक्सीस बँकेची ३ एटीएम कार्ड होती. त्यांनी ही कार्डे स्वत:चीच आहेत, असे भासवून त्याद्वारे १६ हजार रुपये काढले. यावेळी तेथे गस्त घालत असलेल्या पोलिसांना हे दोघे एकाच वेळी इतका वेळ एटीएम सेंटरमध्ये काय करीत आहे असा संशय आल्याने त्यांना पकडून चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

या दोघांकडील ३ कार्डाची माहिती घेतली असता ती कार्डे यांच्या गावाकडील नातेवाईकांची होती. ते ही कार्डे एटीएम सेंटरमधील खाजेत कार्ड घातल्यानंतर पैसे काढण्यासाठी व्यवहार सुरु करीत. त्याचवेळी एटीएम मशीनचा वीज पुरवठा बंद करीत असे. त्यामुळे मशीनने प्रक्रिया सुरु केली असली तरी मध्येच त्यात खंड पडल्याने बँकेला संदेश जात की व्यवहार पूर्ण झाला नाही. प्रत्यक्षात मशीनमधून पैसे काढले गेलेले असत.

त्यानंतर ते आलेली स्लीप घेऊन बँकेत जात व आपल्याला पैसे मिळाले नसल्याचा दावा करीत. व्यवहार अर्धवट झाल्याची बँकेकडे नोंद होत असल्याने बँक त्यांच्या खात्यात पुन्हा ते पैसे भरत असत. दुसरीकडे एटीएममधून मात्र पैसे गेलेले असतात.

अशा प्रकारे एटीएमला चकवा देणाऱ्या अनेक टोळ्या हरियाना, राजस्थान, पंजाबमध्ये यापूर्वी कार्यरत आहेत. या टोळ्यांनी आता आपले हातपाय महाराष्ट्रातही पसरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या रक्कम काही हजारात असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या व्यवहारात ही रक्कम अनेकदा बँकांच्या लक्षातही येत नाही. त्याचा गैरफायदा या टोळ्या घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर अधिक तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

१० हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शन च्या जाळ्यात 

नारायण राणेंच्या पक्षाला मिळाले ‘हे’ अनोखे निवडणूक चिन्ह 

पुण्यात मंडई गणपती परिसरात भीषण आग