घरफोडीसह जबरी चोरीतील दोघे जेरबंद

कुपवाड : पोलीसनामा ऑनलाईन

घरफोडीसह जबरी चोरीतील दोघा अट्टल गुन्हेगारांना कुपवाड औद्योगिक पोलिसांनी आज (गुरुवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, एअरगन, मोबाइल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, त्या दोघांचे साथीदार पसार झाले असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

राजु हुसेन मुल्ला (40, रा. आंधळी, ता. पलूस) व राकेश पंडीत पुजारी (30, रा. वाल्मिकी आवास, सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कुपवाड पोलिस ठाण्यातील तपासी पथक गस्तीवर असताना अहिल्यानगर चौकात राजु आणि राकेश संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्या दोघांनी कुपवाड, मिरज परिसरात घरफोडी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’599154ae-7af6-11e8-bb6b-c987c91f5044′]

त्यावेळी कर्नाळ रोडलगतच्या एका शेतात लपवलेली एअरगनही त्यांनी दिली. या एअरगनच्या माध्यमातून चोरी करत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाइलसह गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला. दरम्यान, त्या दोघांचे साथीदार पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोंजारी, इंद्रजित चेळकर यांनी कारवाई केली.

टोळीवर सात गुन्हे; दोन लाखांची चोरी

राजू मुल्ला, राकेश पुजारीसह चार जणांनी कुपवाड-मिरजे परिसरात दहशत माजवली होती. चाकू आणि एअरगनच्या माध्यमातून लोकांना दहशत दाखवत होते. कुपवाड परिसरात बुधगाव रस्त्यावर एकास अडवून त्यांची दुचाकी व 1500 रुपयांची जबरी चोरी केली. त्यानंतर अजिंक्‍यनगर येथे चाकूचा धाक दाखवत 15 हजार, कानडवाडी (ता. मिरज) येथील ओढ्यात एकास जबरी जखमी, तानंग फाट्यावर एक लांखाची लूट, कुपवाड-मिरज रस्त्यावर चाकूच्या धाक दाखवून दागिन्यांसह 24 हजारांचा मुद्देमाल, कुमठे फाट्यावर दुचाकीसह 55 हजारांची चोरी, मिरजेत 4 हजार 400 रुपयांची चोरी या टोळीने केली आहे. त्या टोळीतील दोघांची नावे पोलिसांसमोर आली असून त्यांचा शोध सुरु आहे.