आरटीओचे दोघे लाचखोर निरीक्षक गजाआड, तिघांवर गुन्हा दाखल

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावरील राज्य परिवहन विभागाच्या कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील व गणेश सजन पिंगळे या दोघा अधिकाऱ्यांना खासगी पंटरामार्फत ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई सुरु असतांना खासगी पंटर मात्र घटनास्थळावरुन पसार झाला आहे. यापकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र-मध्यपदेश राज्याच्या सीमेवरील हाडाखेड, ता.शिरपूर येथील राज्य परिवहन विभागाच्या तपासणी नाक्यावर तपासणीकरीता अडविलेल्या वाहनाची कागदपत्रे व इतर बाबींची पुर्तता असतांनाही वाहन तपासणी नाक्यावरुन पुढे जाऊ दिले जात नाही. ही वाहने सोडण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. या सीमा तपासणी नाक्यावरील राज्य परिवहन विभागाचे अधिकारी त्यांच्या खाजगी पंटरांमार्फत पैशांची मागणी करतात आणि त्या पंटरांमार्फत लाच स्वीकारली जाते.

त्यामुळे अशा प्रकारे पैशांची मागणी केल्यास संबंधित आरटीओ अधिकारी, कर्मचारी आणि खासगी पंटर यांच्याविरुध्द कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यात मालाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या कार्यालयात केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबतची पडताळणी केली असता तक्रारदार हे त्यांच्या मालट्रकने इंदूरकडे जात असतांना हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावरील परिवहन विभागाच्या कार्यालयात एका अज्ञात खाजगी पंटरने तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या ट्रकचा परवाना मागितला व त्यांचा मालट्रक हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावरुन मध्यप्रदेशाकडे जाऊ देण्यासाठी परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील व गणेश सजन पिंगळे या दोघा अधिकाऱ्यांनी त्यांना अनधिकृतपणे लाच घेणे सुलभ व्हावे म्हणून त्या खाजगी पंटरास संमती व प्रोत्साहन दिल्याने संबंधित पंटराने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. यानंतर पथकाने पाटील व पिंगळे दोघांना ताब्यात घेतले. मात्र, ही कारवाई करत असतांना पंटर मात्र पसार झाला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.