मुख्यमंत्र्यांना ‘प्लास्टिक’मध्ये दिला ‘बुके’, शिवसैनिकांनाच ठोठावला ‘दंड’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद दौऱ्यावर असून ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना प्लास्टिक बंदीचे भान राहिले नाही. पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागतासाठी प्लास्टीकमधून बुके आणला. त्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शिवसेनेच्या त्या दोन पदाधिकाऱ्यांना तात्काळ दंड ठोठावला. आयुक्त आस्तिक पाण्डेय यांना मुख्यमंत्री थांबलेल्या रमा इंटरनॅशनलमध्ये ही कारवाई केली.

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक पाण्डेय यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्लास्टिक विरोधी करावाई सुरु केली आहे. ज्या दिवशी पाण्डेय आयुक्तालयात रुजू झाले त्याच दिवशी त्यांनी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक आर.एम. महाजन यांना दंड ठोठावला होता. महाजन हे त्यांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ घेऊन आले होते. त्यावेळी पाण्डेय यांनी तात्काळ महाजन यांना प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड केला होता. तसेच नगरसेविका मनिषा मुंडे यांना देखील त्यांनी पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला होता.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी रमा हॉटेलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. लातूर येथील पदाधिकारी रामेश्वर पाटील आणि जालना येथील पदाधिकारी मनीष श्रीवास्तव यांनी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणला होता. आयुक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना दंड करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशावरून त्या दोघांकडून दंड आकरण्यात आला. त्या दोघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करून पावत्या देण्यात आल्या.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/