अंगणात खेळणाऱ्या 2 चिमुकल्या बहिणींना कंटेनरने चिरडले

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव कंटेनरने घरासमोर अंगणात खेळणा-या दोन चिमुकल्या बहिणींना जागीच चिरडले. जालना- सिंदखेडराजा महामार्गावरील जालना तालुक्यातील नाव्हा शिवारात बुधवारी (दि. 9) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

सुमया सलीम शेख (वय 10) आणि शाहिन सलीम शेख (वय 6 रा. धारकल्याण) असे ठार झालेल्या बहिणींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेड राजा येथून जालन्याकडे एक कंटेनर बुधवारी दुपारी भरधाव वेगात निघाला होता. तालुक्यातील नाव्हा शिवारात आल्यानंतर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले अन् कंटेनर रस्त्यालगत असलेल्या कासम शेख यांच्या घराचे कंपाऊंड तोडून अंगणात घुसले. त्यामुळे अंगणात खेळणा-या कासम शेख यांच्या दोन नाती कंटेनरखाली चिरडल्या गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तसेच घरांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर ताब्यात घेतले असून दोन्ही मृत मुलीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.