उस्मानाबादमध्ये 2 पाझर तलाव फुटले, नागरिकांचं स्थलांतर ! जाणून घ्या इतर तालुका अन् जिल्ह्यांची स्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलााईन – राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नद्यांच्या पाणी पात्रात वाढ होताना दिसत आहे. पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, उस्मानाबाद सोबतच विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानं रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुण्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मुरशदपूर आणि परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण येथील 2 पाझर तलाव फुटले आहेत.

उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसानंतर पुराचा हाहाकार समोर आला असून 2 पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्यानं पिकांचंही नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला असून जीवितहानी झालेली नाही. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलं आहे. बेडगा येथील 2, गुंजोटी 3, राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

उमरगा तालुक्यातील कदेर येथे अडकलेल्या 2 जणांना काढण्यासाठी एअर लिफ्टींगची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 दिवसांच्या पावसानं हाहाकार माजला आहे. लोहारा, उमरगा परिसरात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतात काढून ठेवलेलं सोयाबीन वाहून गेलं तर दुसरीकडे ऊसाचं शिवारही पाण्याखाली गेलं आहे. पाण्याच्या प्रवाहानं शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे.

इंदापूर

बुधवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळं बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावातील भाऊसाहेब चोरमले या शेतकऱ्यानं 12 एकरात ऊसाची लागवड केली होती. पावसामुळं पूर्ण ऊस जमीनदोस्त झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

कराड

कराड तालुक्यात गेले 2 दिवस पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळं तालुक्यातील काढणीस आलेलं सोयाबीन आणि भात पीक पाण्याखाली गेली असून पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शहरासह तालुक्यात सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

पालघर

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरातील परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

नांदेड

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पिकांमध्ये पाणी साचल्यानं सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर यांचं नुकसान झालं आहे. ऊसाच्या शेतात पाणी साचल्यानं ऊसाला मुळ्या फुटतायत. शेतात आलेल्या सर्व पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.

पंढरपूर

पावसामुळं नदी, नाले दुथडी भरू वाहत आहेत. शेतीला जलतरण तलावाचं रूप आले आहे. पंढरपूर तालुक्यात हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्यानं द्राक्षं, डाळींब तसंच खरीप पिकांचं कोट्यावधीचं नुकसान झालं आहे.

लातूर

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे. सोयाबीन आणि ऊस शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेतीला तलावाचं स्वरूप आलं आहे.

अहमदनगर

जोरदार पावसामुळं तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव पूर्णपणे भरला आहे. तलाव भरून सांडव्यातून वाहणारं पाणी पुलावर आलं आहे. त्यामुळं नगर ते वांबोरी वाहतूक विस्कळीत होऊन बंद करण्यात आली आहे. पावसामुळं जिल्ह्यातील ओढे, नाले तसेच नद्या वाहू लागल्या आहेत. पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बीड

बीड जिल्ह्यात सर्वदूर पिकांचं नुकसान झालं आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतीला अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. कापूस नासला आहे तर सोयाबीनवर बुरशी चढली आहे. आता कसं जगायचं हा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे.