दापोडीत पूल बांधणी कसरती दरम्यान 2 सैनिकांचा मृत्यू, 9 जखमी

पुणे (दापोडी) : पोलीसनामा ऑनलाइन – दापोडी येथील मिलीटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुल बांधणीच्या सरावादरम्यान अचानक पुल कोसळल्यामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला तर 9 जवान गंभीर जखमी झाले आहेत. यात एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली. जखमींना खडकी येथील मिलीटरी हॉस्पिटल आणि पुण्यातील कमांड हॉस्पीटल येथे उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे.

हवालदार पी.के. संजीवन आणि नाईक बी.के. वाघमोडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मेजर सुर्यजित सिंग, सुभेदार पी. शंमुग्म, नायक डी.सी. शर्मा, हवालदार परमजीत सिंग, नायक गुरपीत सिंग यांच्यावर खडकी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर नायक गोरे बी.पी., नायक शरद खोले, नायक देवेंद्र सिंग बिष्ट यांच्यावर पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर नायक मंदीप सिंग यांच्यावर सीएमई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

युद्धात आलेले नैसर्गिक आणि कृत्रिम अडथळे दूर करण्यासाठी पुण्यातील कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरिंग येथे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. गुरुवारी पुल उभारणीचे प्रात्यक्षिके महाविद्यालयात सुरु होती. बेली ब्रीज नामक पुल उभारणीचे काम सुरु असताना आधार देणारा टॉवर अचानक हलल्यामुळे पूल खाली कोसळला. यावेळी पुलाखाली दहा ते बारा जवान होते. या पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या जवानांना तातडीने बाहेर काढून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना या अपघाताबाबत कळविण्यात आले आहे. ही घटना कशी घडली या बाबत चौकशी समिती (कोर्ट ऑफ इन्कॉयरी) स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यावर या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी महिती लष्कराच्या सुत्रांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/