केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सेक्रेटरी सुखरूप, सोबत असलेल्या लातुरच्या डॉक्टरांचे अपघातात निधन

पणजी : वृत्तसंस्था – उत्तर गोव्याचे खासदार असलेल्या श्रीपाद नाईक ( Shripad naik) यांच्या वाहनाला उत्तर कर्नाटकातील अंकोला तालुक्यात सोमवारी रात्री आठ वाजता अपघात (Accident) झाला. त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाला धडक दिली व त्याबरोबर गाडी उसळली व पडली. श्रीपाद नाईक यांच्यासोबत वाहनात एकूण सहा माणसे होती. डॉ. दिपक घुमे हेही वाहनात होते. घुमे हे लातुर- महाराष्ट्र येथील आहेत. त्यांचे निधन झाले. सहापैकी दोघांचे मृत्यू झाले. दोन्ही मृत्यूबाबत गोव्यात लोकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. वाहन चालक जखमी झाला. श्रीपाद नाईक यांच्या स्वीय सहाय्यकाचे निधन झालेले नाही.

दरम्यान, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर मंगळवारी पहाटे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृतदेह गोव्यात आणला गेला आहे. आज अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. कदाचित उद्या बुधवारी केले जाऊ शकतात. श्रीपाद नाईक यांची प्रकृती आता स्थिर आहे. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात डीन डॉ. बांदेकर यांच्या देखरेखीखाली नाईक यांच्या खांद्यावर व अन्यत्र अशा दोन शस्त्रक्रिया केल्या गेल्या. पहाटे तीन वाजता शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या जिवीतास धोका नाही.

विजया नाईक यांचा मृतदेह अकोला येथून गोव्यात आणण्यात आला पण अंत्यसंस्कार मंगळवारी केले जाणार नाहीत. सापेर, रायबंदर येथे नाईक यांचे निवासस्थान आहे. तिथे त्यांचे पुत्र सिद्धेश नाईक, साईश व योगेश उपलब्ध असतील. लोक सांत्वनपर भेटीसाठी तिथे जाऊ शकतात असे दत्तप्रसाद नाईक यांनी कळवले आहे. विजया नाईक यांच्यावर अंत्यसंस्कार कधी केले जातील ते नंतर जाहीर केले जाणार आहे. नाईक यांच्या पत्नीचे निधन झाले आहे हे नाईक यांना मंगळवारी सकाळपर्यंत तरी सांगितले गेले नाही. कारण श्रीपाद नाईक यांना तो मानसिक धक्का ठरू शकतो. नाईक यांच्या पत्नी विजया ह्या अतिशय सुस्वभावी होत्या व त्यांचे योगदान पती श्रीपाद नाईक यांच्या पूर्ण यशस्वी राजकीय कारकिर्दीत मोठे आहे. घरी आलेल्या सर्वांचे विजया नाईक ह्या आदरातिथ्य करायच्या. त्यांच्या निधनामुळे गोव्यात सर्वत्र दु:ख व्यक्त होत आहे. यावेळी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळास भेट दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे पहाटे दोन वाजेपर्यंत इस्पितळात होते. श्रीपाद नाईक यांच्या तब्येतीविषयी तिथे डॉक्टरांशी चर्चा केली. तसंच विचारपूस देखील केली.