अवकाशात सापडले 2 पृथ्वीसारखे ‘ग्रह’, आकारानं दोन्हीही पृथ्वीपेक्षा ‘दुप्पट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शास्त्रज्ञांना अवकाशात दोन पृथ्वीसारखे ग्रह सापडले आहेत. दोन्ही ग्रहांवर जीवनाची शक्यता देखील असल्याचे मानले जात आहे. हा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञांनी घेतला आहे. हे दोन ग्रह आपल्या पृथ्वीसारखे आहेत आणि त्यांचे अंतर 11 प्रकाश वर्षे आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की या सुपर पृथ्वीचे नाव ग्लिझ 887 (Gliese 887) आणि ग्लिझ 887बी (Gliese 887B) आहे. दोन्ही आपल्या पृथ्वीच्या आकारापेक्षा दुप्पट आहेत. त्यांचे वस्तुमान देखील अधिक आहे. दोन्ही ग्रह युरेनस आणि नेपच्यूनपेक्षा लहान आहेत. दोन्ही नवीन ग्रह आपल्या सौर मंडळाच्या बाहेर मिळाले आहेत. हे दोन्ही ग्रह युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंग्टनच्या खगोलशास्त्रज्ञ सँड्रा जेफर्स यांनी शोधले आहेत.

सँड्रा म्हणतात की या ग्रहांमुळे आपल्या सौर मंडळाच्या बाहेरच्या जीवनाची शक्यता वाढते. त्यांच्या या अभ्यासाचा मोठा फायदा होईल. जेफर्स यांनी नमूद केले की त्यांच्या पथकाने स्पेक्ट्रोग्राफचा वापर करून सिस्टमचे परीक्षण केले. सँड्राच्या टीमने ग्लिझ 887 वरील सुमारे 20 वर्षांच्या डेटाचे विश्लेषण केले. दोन्ही नवीन ग्रहांची कक्षामध्ये फिरण्याची गती जास्त आहे. ते बुधच्या तुलनेत देखील जास्त वेगाने फिरत आहेत.

ग्लिझ 887बी आणि ग्लिझ 887 त्यांच्या तार्‍याजवळ स्थित आहेत. येथे द्रव स्वरूपात पाणी असण्याचीही शक्यता आहे. हे दोन्ही ग्रह मंगळ व पृथ्वीसारखे खडकाळ ग्रह देखील असू शकतात.

नव्याने शोधलेल्या दोन्ही ग्रहांचे वातावरण पृथ्वीच्या वातावरणाच्या तुलनेत जास्त स्थूल असू शकते. म्हणून येथे जीवनाच्या अपार शक्यता आहेत. पण शास्त्रज्ञ अजूनही अध्ययन करत आहेत. जेणेकरून या ग्रहांवर जीवनाची शक्यता पक्की होऊ शकेल.