गुन्हे शाखेच्या सहायक फाैजदारासह ‘त्या’ दोघांचे तडकाफडकी निलंबन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल टॉवरच्या चोरीच्या बॅटऱ्या घेतल्याच्या संशयावरून भंगार दुकानातील कामगारांना चौकशीला आणून, त्यांना बेदम मारहाण करून, एका कामगाराला ‘शॉक’ देऊन मालकाकडून साडेआठ लाख रुपये घेतल्या प्रकरणी गुन्हे शाखेतील सहायक फाैजदार, त्याचा साथीदार आणि इतरांवर खंडणीचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी या सहायक फाैजदारासह दोघांचे तत्काळ निलंबन केले आहे. या प्रकरणी इस्तीयाक उर्फ मुस्ताक महलू खान (३०, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. तर गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार रमेश नाळे आणि केदारी यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाची खातेनिहाय चौकशी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्याकडे दिली असल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली.

रमेश नाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २० नोव्हेंबर रोजी रात्री आणि २१ नोव्हेंबर रोजी रात्री खान यांच्या भंगार दुकानातील कामगार सुमित यादव, अब्दुल खान, सर्वेश गौतम, मोहम्मद खान, अब्दुल करीम खान, वसीम खान, अनुकुमार खान या सर्वांना चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यलायत आणले. चोरुन आणलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटरी घेत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी रमेश नाळे यांनी चौकशी करुन कामगाराना बेदम मारहाण केली. तसेच त्यातील एकाला विजेचा शॉक देखील दिल्याचे आरोप होत आहेत.
या सर्वांना आणि मालकाला गुन्हा दाखल न करता सोडून देण्यासाठी नाळे यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. इस्तीयाक उर्फ मुस्ताक महलू खान यांच्याकडून साडे पाच लाख रुपये आणि भागीदार धनराज अकोदीया यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन सोडून दिले.