दुकान फोडून चोरी करणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भवानी पेठ भागातील टिंबर मार्केटमधील दुकानाचे शरट उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्याची नाणी, चांदी आणि मोबाईल असा २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

शंभू बाबू मदारी (वय २८), विशाल खंडू अवघडे (वय २४, दोघे रा. राजीव गांधी कॉम्प्लेक्स, कासेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदारी, अवघडे आणि अल्पवयीन साथीदाराने टिंबर मार्केट येथील एका दुकानाचे शटर उचकटून तेथून सोन्याचे, चांदीचे नाणे व मोबाईल चोरून नेला होता. या प्रकरणी व्यावसायिकाने तक्रार दिली होती. त्यानुसार खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एककडून समांतर तपास करण्यात येत होता. त्यावेळी मदारी, अवघडे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने टिंबर मार्केट भागात चोरी केल्याची माहिती पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन साथीदारासह त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोने, चांदीची नाणी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, अमोल पवार, अजय थोरात, मल्लिकार्जुन स्वामी यांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. मदारी, अवघडे यांनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने टिंबर मार्केट परिसरात चोरीचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

Loading...
You might also like