Nashik News : नाशिकमध्ये 2000 च्या नोटेचे दर्शन दुर्लभ, अनेकांनी घेतली धास्ती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बाजारात दोन हजारांची नोट दिसेनाशी झाली आहे. अगदी ठराविक प्रमाणातच कुठेतरी नोट बघवायास मिळत आहे. दुसरीकडे त्यांची छपाईदेखील बंद आहे. पूर्वी चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोट बाजारात दिसत नाही. तर मग त्या गेल्या तरी कुठे, असा प्रश्‍न सर्वांना पडत आहे. एटीएममधूनही पाचशे आणि शंभराच्या नोटाच बाहेर येत आहेत. त्यामुळे 2 हजाराच्या नोटेचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने दोन हजारांची नोट व्यवहारात आणली. अनेकानी त्यास असमर्थता दर्शविली होती. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर नोटेची छपाई झाली. अशी ही नोट गेल्या महिन्यापासून बाजारात दिसेनाशी झाली आहे. बॅंकेच्या व्यवहारातही दोन हजारांच्या नोटा दिसत नाहीत. चलनात घटलेल्या प्रमाणामुळे काही बॅंकेच्या एटीएममधून दोन हजारांचा कप्पादेखील काढण्यात आला की काय, असे भासत आहे. अनेकांनी बऱ्याच महिन्यांपासून दोन हजारांची नोटही बघितली नसल्याचे सांगितले. दोन हजारांच्या नोटेपेक्षा एक हजाराची नोट बरी असल्याचेही सांगण्यात आले. याबाबत फैज बॅंकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी नासीर शेख म्हणाले की, बाजारातील चलनात दोन हजारांच्या नोटेचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. बॅंकेतही नाहीच्या प्रमाणात दोन हजारांच्या नोटेचा भरणा येत आहे.

नोटाबंदीची धास्ती
केंद्र सरकारतर्फे अचानक नोटाबंदी केली होती. बराच काळा त्याचा परिणाम नागरिकांना सोसावा लागला. काही व्यावसायिक, व्यापारी अजूनही त्यातून सावरलेले नाहीत. त्यातच काही महिन्यांपासून बाजारात दोन हजारांची नोट दिसत नाही. पुन्हा नोटाबंदीचे संकेत तर नाही ना असा प्रश्‍न नागरिक, व्यावसायिक उपस्थित करत आहे. कुठे तरी त्यांच्यात धास्ती निर्माण झालेली दिसत आहे.