परांड्याहून मुंबईला चालविलेले दोन टन गोमांस जप्त

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – रात्रीच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथून मुंबईकडे गोमांसाची तस्करी करणारे दोन टेम्पो पोलिसांनी नगरमध्ये पकडले. पोलिसांनी दोन टन गोमांस, वाहने असा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे. नगर-कल्याण रस्त्यावर आज ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी गणेश शांताराम कुर्‍हाडे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर, जि.पुणे), आमीर परवेज रज्जाक शेख (वय 30, रा. शिवाजीनगर, लोटस कॉलनी, गोवंडी पश्चिम, मुंबई), मोहमंदअली गोसमहम्मंद पटेल (रा. राजुरी) या तिघांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अशी की, नगर-कल्याण रस्त्याने रात्रीच्यावेळी गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती नियंत्रण कक्षास मिळाली होती. त्यावरून कोतवाली पोलिसांना नियंत्रण कक्षाने कळविले. पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी रात्र गस्त अधिकारी  पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून पाटील यांच्या पथकाने  नेप्ती नाक्याजवळील दिनेश हॉटेल येथे सापळा रचला. पथकाने पाठलाग करून दोन वाहने अडविली.

त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूलाला थांबविले. सुरुवातीला पिकअपची पाहणी केली. त्यात मागील हौदामध्ये भुश्याचे गोण्या आढळून आल्या. त्या गोण्याखाली पाहणी केली असता लहान-मोठ्या आकाराचे मांसाचे तुकडे दिसून आले. चालकाचे नाव गणेश शांताराम कुर्‍हाडे होते. हे वाहन महंम्मद अजीज शेख याच्या मालकीचे होते. सदर माल हा परांडा येथील कुरेशी (पूर्णनाव व पत्ता माहीत नाही) येथून आणल्याचे सांगण्यात आले. पिकअपमध्ये सुमारे 500 किलो वजनाचे गोमांस आढळून आले. पोलिसांनी 60 हजार रुपयांचे गोमांस व पिकअप जप्त केले.

दुसर्‍या आयटर टेम्पोच्या मागील वाहनाचे हौदामध्ये तपासणी केली असता त्यात दीड टन वजनाचे 1 लाख 80 हजार रुपयांची गोमांस होते. पोलिसांनी गोमांस व वाहन जप्त केले. टेम्पोवर आमीर परवेज रज्जाक शेख हा चालक होता. त्याच्यासोबत मोहमंदअली गोसमहम्मंद पटेल हा होता. हा टेम्पो हा मुदस्सर मोमीन (रा. आळेफाटा, जि. पुणे) याच्या मालकीचा होता. हा  माल परांडा येथील कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्या मालकीचा होता.

दोन टन गोमांस, वाहने असा एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.