शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत काँग्रेसनं दिलं ‘हे’ संकेत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसतानाच शिवसेनेने दुसरे पर्याय असल्याचे म्हटले आहे. शिवसेना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. काँग्रेसची विकासकामे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान याबाबत शिवसेनेने वारंवार प्रशंसा केली आहे.

भाजप आणि शिवसेनेत हाच मुलभूत फरक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनतेने आम्हाला सक्षम विरोधी म्हणून निवडले आहे. ती भूमिका आम्ही पार पाडू असेही गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे. तसेच नोटबंदी, अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती, भूक बळी, बेरोजगारी, बँक घोटाळ्यांमध्ये पाच वर्षात झालेली वाढ.

या घटनांमुळे सरकारच्या धोरणांविषयी शंका निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून भाजपच्या जागा घटल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, जनता अजुनही भाजप सेनेकडून आशावादी होती म्हणून त्यांना संधी दिली. मात्र, आम्हाला विरोधीपक्ष म्हणून कौल मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. नोटबंदीच्या मुद्यावरुन तिवारी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. खासगी कंपन्यांना रेड कार्पेट घालून द्यायचा या सरकारचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले. नदी जोड प्रकल्प रद्द करण्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप केले. खान्देशला फायद्याचा ठरणारा नदीजोड प्रकल्प मोदी आणि अमीत शहा यांच्या दबावामुळे फडणवीस यांनी रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.

पाठिंब्याबात दोन मतप्रवाह

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. भाजप घटनात्मक चौकटी मोडायला निघाला आहे. त्यामानाने शिवसेना आक्रमक असला तरी कुणाचा द्वेष करणार नाही. त्यांनी वारंवार काँग्रेसच्या विकासकामांची प्रशंसा केली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेस पाठिंबा देण्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे तिवारी यांनी सांगितले. सोनिया गांधी यांच्याकडून कुठलाही निर्णय याबाबत झालेला नाही. शिवाय शिवसेनेकडून तसा प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com