देशातील नागरिकांना गंडा घालणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील विविध भागातील नागरिकांना आमिष देऊन आप्लाय जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या दोन भामट्यांना वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना दिल्ली येथून अटक करण्यात आली असून ६ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहूल सुजनसिंग यादव (२२ रा. कन्नोज उत्तर प्रदेश) व पंकज जगदीश राठोड (२८ रा. दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर सुरू करून त्याच कॉल सेंटरच्या माध्यमातून देशातील विविध भागातील नागरिकांना सुमारे २ कोटींनी गंडा घातला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक हवालदारपुरा येथील वृषभ करंडे याला अज्ञात व्यक्तीने फोन करून खोटी बतावणूक करीत त्याची ३ लाख ६० हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस यांनी समांतर तपास केला. याच दरम्यान माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका चमूने दिल्ली गाठली. तेथे सात दिवस आवश्यक माहिती गोळा करून या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राहूल यादव व पंकज राठोड याला ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट कॉल सेंटरमधील मोबाईल, संगणक, राऊटर इतर साहित्य असा एकूण ६ लाख ३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, छाया तेलघोटे, कुलदीप टांकसाळे, कुणाल हिवसे, अनुप कावळे, जगदीश डफ, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, आनंद भस्मे, दिवाकर परिमल, मुकेश येल्ले यांनी केली.